Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा दबदबा होता. त्यांनी आजवर त्यांच्या नावाप्रमाणेच अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी घशाच्या त्रासामुळे नाटकापासून ब्रेक घेतला.
छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवलेले विक्रम गोखले!
विक्रम गोखलेंच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. ‘या सुखानों या’, ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’ अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखलेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. तसेच ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अर्धम’ अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी काम केलं आहे. रंगभूमी, छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे विक्रम गोखले वेब-सीरिजपासूनदेखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनी ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. सध्या विक्रम गोखलेंचा ‘गोदावरी’ सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.
Source link